नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती
। उरण । वार्ताहर ।
खराब हवामानाचा फटका जेएनपीए बंदरात मालवाहू करणार्या जहाजांनाही बसल्याने ये-जा करताना विलंब होऊ लागला आहे. जहाजांच्या विलंबामुळे मात्र मागील 8 दिवसांपासून बंदरातील आयात-निर्यात मालाची वाहतूक काहीशी थंडावली आहे.
यामुळे बंदराच्या प्रवेशद्वारापासून तीन-चार किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर मालाची वाहतूक करणार्या ट्रेलरच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी होणार्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
समुद्रातील खराब हवामानामुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे जेएनपीए बंदरात दाखल होणारी मालवाहू जहाजे 25 दिवसांवरून 40 दिवसांवर पोहोचला आहे. मालवाहू जहाजांना बंदरात दाखल होण्यासाठी होणार्या विलंबामुळे मात्र, हजारो कंटेनर जेएनपीए बंदरांत पडून आहेत. परिणामी बाहेरून ये-जा करणार्या कंटेनर वाहतुकीच्या ट्रेलर्सना जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कंटेनरच्या रांगा जेएनपीए प्रवेशद्वारापासून लागत आहेत. मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक थंडावली आहे. एक जहाज गेल्यानंतरच त्याठिकाणी दुसरे लागते. त्यामुळे बंदरातही जागा रिक्त होण्यास विलंब होत आहे. मात्र कामकाज काहीअंशी पूर्वपदावर आले आहे, असे एस. के. कुलकर्णी म्हणाले.