। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जलपूजन करूनही स्मारकाचे कामच सुरू झाले नाही. त्याचा निषेध करून सरकारला जागे करण्यासाठी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील शिवप्रेमी मंगळवारी (दि.24) सकाळी 10 वाजता मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर धडकले होते. यावेळी, जलपूजनाला परवानगी न देणार्या पोलिसांना गुंगारा देत अरबी समुद्रात जलपूजन दिन साजरा करत सरकारचा नाकर्तेपणाच उघडा पाडण्यात आला आहे.
गिरगाव चौपाटीवर परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी गेटवे ऑफ इंडिया येथे जलपूजनाचा निर्णय घेतला होता. मात्र, तेथेही पोलिसांनी मज्जाव करून आंदोलकांना अटक केली आणि आझाद मैदानावर आणून येथे जलपूजन करा असे फर्मान सोडले. जलपूजनाला परवानगी नाकारल्यानंतरही शिवप्रेमींनी गनिमी काव्याने जलपूजन केले. यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे पाटील, संतोष तांबे पाटील, रवींद्र नीळ, अशोक वीरकर, भारत जाधव, राजुभाऊ नलावडे, देविदास राजळे पाटील, चंद्रकांत सावंत, रोशन डूलगज, नितीन भराट उपस्थित होते.







