अल्पवयीन मुलीसाठी शिवसेना आक्रमक

। पेण । प्रतिनिधी ।

पेणमधील पोस्को गुन्हा अंतर्गत अटक झालेल्या मनीष नरेंद्र म्हात्रे आणि पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे, अशा वारंवार होणार्‍या अत्याचारात माता भगिनी नाहक शिकार होत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका सामान्य जनतेच्या मनात येत आहे. उरण व बदलापूर अशी अनेक प्रकरणे ताजी असतानाच आजही त्या गुन्हेगारांना योग्य ते शासन झालेले नाही. त्यासाठी रविवारी (दि.2) शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे पेण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

गुन्हेगार कितीही मोठा किंवा त्याचावर राजकीय वरदहस्त असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. पेणमधील गुन्हा तर अल्पवयीन मुलीवर झाला आहे. प्रेमाची खोटी आश्‍वासने देऊन फक्त शरीरसुखासाठी हे असे नीच वृत्तीचे तरूण मुलींचे आयुष्य बरबाद करत आहेत. तरी या प्रकरणी कुठलीही तमा न बाळगता सखोल चौकशी करूप दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी. कारण असे कृत्य करणार्‍याला हा एकच पर्याय आहे. त्यामुळे दुसर्‍या गुन्हेगाराच्या मनात खाकी ची धाक वाढू शकते. तरी सर्व जनतेची शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्यावतीने मागणी आहे की, लवकरात लवकर दोषी व्यक्तींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, असे या निवेदानात म्हटले आहे. यावेळी दीपश्री पोटफोडे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, स्मृती म्हात्रे, छाया बामणे, मोहिनी म्हात्रे, हिराजी चोगले, नंदू मोकल, गजानन मोकल, विजय पाटील, योगेश पाटील, विनोद म्हात्रे, समिर म्हात्रे, नामदेव पिंगलस्कर, राकेश पाटील, तुकाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version