अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची घोषणाबाजी
| मुंबई | प्रतिनिधी |
ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील ताज लँड हॉटेलबाहेर शुक्रवारी (दि.14) राडा झाला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणित संघटनेत घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं.
अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणित संघटना आहे. तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये राडा झाला. ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी स्वतः अनिल परब त्या ठिकाणी गेले. हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनिल परबांना पोलिसांनी अटकाव केला. त्यानंतर अनिल परबांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीत माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असं म्हणत त्यांनी पोलिसांना जाब विचारला.
भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच जावं असं पोलिसांनी सांगितलं. त्याला अनिल परबांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का, असं म्हणत अनिल परबांनी संताप व्यक्त केला.
भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यामध्ये शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या फसवून सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.







