| मुंबई | वार्ताहर |
राजस्थानसह देशातील पाच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या शिवसेना पक्षाने राजस्थान विधानसभेच्या निवडणुका लढण्याची तयारी सुरु केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार की एकत्रित? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे राजस्थानच्या दौऱ्यावर होते. शिंदेंच्या जयपूर दौऱ्यात राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंग गुढा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तिथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विस्ताराची योजना सांगितली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी राजस्थान निवडणुकीत सेनेचे उमेदवार उभे करण्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत परवानगी द्यावी, अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.