। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना खा.संजय राऊत यांनी, शिवसेना युपीएचा भाग नसल्याचे वक्तव्य केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बिगरभाजपा पक्षांची एकत्रित रणनीती आखण्यासाठी तसेच, संसदेबाहेरही विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ या निवासस्थानी झाली. या बैठकीला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, सिताराम येचुरी यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना हा खुलासा केला आहे. युपीएबद्दल त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना युपीएचा भाग नाही. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे तीन प्रमुख पक्ष जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतात, काम करतात तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे. राज्य स्तरावरील हे युपीए असून उत्तम प्रकारे काम सुरु असल्याचे प्रतिपादन पुन्हा एकदा खा.संजय राऊत यांनी केले आहे.
तर ममता बॅनर्जी आणि युपीए याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत खा.राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि शिवसेना यांचे संबंध स्नेहपातळीवर घनिष्ठ स्वरूपाचे आहेत. पण राजकीय मतभेद हे विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. आमच्याप्रमाणे त्याही भाजपसह लढत आहे.
याशिवाय या पत्रकार परिषदेत पंतप्रधान आणि भाजपला लक्ष्य करत त्यांनी टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा वैगेरे ठीक आहे, पण देशातील जनता महागाईच्या वाटेवर होरपळून निघाली आहे. तिला जे चटके बसत आहेत त्यावर तुमच्याकडे काय उपाय काय आहे यावर संसदेत आज वादळी चर्चा होईल. पंतप्रधान महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर पंतप्रधान जास्त बोलताना दिसत नाहीत, अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली.