अपात्रता सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण

विजय वडेट्टीवारांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
| मुंबई | वृत्तसंस्था |
शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी केली आहे. वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना याबद्दल पत्र लिहीलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडट्टेवार यांनी याबद्दल माहिती दिली आहे. वडट्टेवार म्हणाले की, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.“

“लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे. संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.“ असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टानं निर्देष दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुनावणीच्या कामाला वेग आला आहे. 14 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडल्यानंतर ती दोन आठवडे पुढे ढकलण्यात होती पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार 25 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या सुनावणीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. स्वतः नार्वेकर यांनी याचे संकेत दिले आहेत.

Exit mobile version