पालकमंत्री हटावसाठी शिवसेना एकवटली

अलिबागमध्ये शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
शिवसेनेचे तिन्ही आमदार करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह सर्व कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याने संतप्त शिवसेनेच्या आमदारांनी सुरु केलेली पालकमंत्री हटाव मोहिम आता आणखी तीव्र झाली आहे. आज अलिबागमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेच्या मुळावर उठलेल्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना शिवसेनेच्या तीन्ही आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी एकमुखांनी केली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील मतभेद टोकाला पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांच्या सह जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, अनिल नवगणे आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टिका केली. आमदार भरत गोगावले म्हणाले की, आपण जो लढा हातात घेतला आहे तो आता पुर्ण करु या. आणि रायगडला आणि शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न करु या. यांची मक्तेदारी कुठेतरी थांबवूया. आमदार भास्कर जाधव यांनी तटकरेंविरोधात आरोपांची जी जंत्री वाचली त्यातला एक शब्दही ते खोडू शकले नाहीत. त्यामुळे अधिक काही सांगण्याची गरज नाही. तुमच्यावर जो अन्याय झाला आहे तोच आमच्यावर आणि आमच्यावर झालेला अन्याय तुमच्यावर झाला आहे. शिवसेनेचे बाळासाहेबांचे आपण शिलेदार आहोत. आता जे होईल ते जाईल. आता हा पालकमंत्री आपल्याला नको आहे. शिवसेनेचा कोणीही पालकमंत्री द्यावा आम्ही त्याचा स्विकार करु. या पालकमंत्र्यांना महाराष्ट्रात कुठेही न्यावं आमचे काही म्हणणे नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करुन आणलेली कामे आपणच केल्याचा खोटा दावा करण्याच्या कामा पलिकडे पालकमंत्री काहिच करीत नाहीत. पालकमंत्री तुम्ही खासदार तुम्ही म्हणजे सार्‍या कामाचे श्रेय तुमचे? आघाडीच्या सरकार असताना आम्हाला बोलवायला कमीपणा का? आम्ही किती सहन करायचे याला मर्यादा आहेत. पालकमंत्र्यांचे काय करायचे ते आता आम्ही बघुन घेवू. शासकीय कुठल्याही समितींना मान्यता दिली जात नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रभाग रचनेत कोणालाही विश्‍वासात घेतले नाही. 15-15 वर्षे पालकमंत्री असूनही यांचे दोन हून अधिक आमदार होऊ शकले नाही. आता एकच आमदार आले ते देखील राहतील की नाही हे येणारा काळच दाखवेल. असा इशारा यावेळी भरत गोगावले यांनी दिला.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, आता खर्‍या अर्थाने रायगडला जाग आलेली आहे. भरतशेठ गोगावले यांनी माणगावमधून दिलेला आवाज बुलंद करु. दोन वर्षे आम्ही संघर्ष करीत होतो. पक्षप्रमुखांच्या आदेशाने चालत होतो. महाविकास आघाडीचे सरकार चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. रायगड जिल्ह्यात आमच्या मतदारसंघात काम करत असताना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी अन्याय होत होते हे जाहिरपणे आम्ही सांगत होतो. प्रत्येकवेळी पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करण्याचे काम आम्ही तीनही आमदार प्रामाणिकपणे करत आलो होतो. मात्र आतापर्यंत पालकमंत्री आणि तटकरे यांच्याकडून शिवसेनेला आणि आमदारांना दाबवण्याचेच काम केले जात होते. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला होता की पालकमंत्री राष्ट्रवादीचा असला तरी समान न्याय मिळेल. मात्र आज कोणताही शब्द पाळला जात नाही. अन्याय सुरुच आहेत. आमदारांनी सुचवलेल्या कामांना केराची टोपली दाखविली जाते. आलेला निधी वाटपातही अन्याय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून केला जात आहे. खूप सहन केले, मात्र आता अन्याय सहन करणार नाही. पालकमंत्री हटविल्याशिवाय आम्ही तीन्ही आमदार आता स्वस्थ बसणार नाही. राष्ट्रवादीच्या वल्गना ऐकल्या पण महाडच्या आमदारांना हटविण्यासाठी मायका लाल पैदा झालेला नाही. महाड काय आता श्रीवर्धनचा आमदार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अडीच वर्षे पालकमंत्री पद दिले आता अडिच वर्षे आम्हाला द्या. आभार सुरेंद्र म्हात्रे यांनी मानले.

Exit mobile version