भाजपने विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याने नाराजी
| उरण | वार्ताहर |
उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातर्फे रविवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता रत्नेश्वरी मंदिर सभागृह, जसखार, तालुका उरण येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी भाजपने उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शिवसैनिक नाराज असून, महेश बालदी यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध आहे. निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अतुल भगत यांनी पदाधिकारी मेळावा घेण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, उरण विधानसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला (शिंदे गटाला) विश्वासात न घेता उमेदवारी दिली. वास्तविक पाहता, उरण मतदारसंघात शिवसेनेची चांगली पकड आहे. तळागाळात शिवसेनेचा प्रचार व प्रसार चांगल्या पद्धतीने झाला आहे. शिवसेनेला येथे पोषक वातावरण आहे मात्र, एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता भाजपने अगोदरच आपली यादी जाहीर करून महेश बालदी यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज आहेत. शिवसेनेचा महेश बालदी यांना विरोध असल्यामुळे शिवसेना बालदी यांचे काम करणार नाही, असे अतुल भगत यांनी सांगितले. शिवसेनेने आपला पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीचे भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.