ऑस्ट्रेलियात साकारला शिवकालीन ‌‘वेरिंगड‌’ किल्ला

सातासमुद्रापार शिवरायांचा जयघोष; पवार, कोळंबकर कुटुंबीयांनी जपली परंपरा

| माणगाव | प्रतिनिधी |

महाराष्ट्राची माती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि मराठी संस्कृतीशी असलेली नाळ किती घट्ट असते, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय थेट सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाला आहे. हजारो किलोमीटर दूर परदेशात वास्तव्य असतानाही आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि परंपरेची ओढ मनात जपणाऱ्या माणगावच्या पवार कुटुंबीयांनी दिवाळीनिमित्त शिवकालीन किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारत मराठी अस्मितेचा भगवा अभिमानाने फडकवला आहे.

ऑस्ट्रेलियातील वेरिंग्टन येथे माणगाव शहरातील साईनगर पश्चिम, कालवा रोड येथील विनिता आणि तुषार पवार कुटुंबीय तसेच कोळंबकर कुटुंबीय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून या शिवकालीन किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाच्या नावावरून या किल्ल्याला मोठ्या अभिमानाने ‌‘वेरिंगड‌’ असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती पवार कुटुंबातील चिमुकली जिझा आणि राया! लहानग्या हातांनी किल्ल्याच्या निर्मितीत सहभागी होत या बालचिमुकल्यांनी केवळ एक देखणी कलाकृती साकारली नाही, तर आपल्या मातृभूमीचा इतिहास आणि संस्कृती अनुभवण्याचा एक सुंदर संस्कारही आत्मसात केला. किल्ल्याच्या उभारणीत कोळंबकर कुटुंबीयांनीही मोलाची साथ दिली. एकत्रित कुटुंबभावना, शिवरायांवरील श्रद्धा आणि मराठी संस्कृतीवरील प्रेम यातून ‌‘वेरिंगड‌’ आकाराला आला.

महाराष्ट्रात दिवाळी म्हटली की घराघरांत किल्ले उभारण्याची लगबग सुरू होते. गड-किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याचा इतिहास, मावळ्यांचा पराक्रम, शौर्य आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली जात आहे. विशेष म्हणजे, हीच परंपरा आता परदेशातील भूमीवरही तितक्याच आत्मीयतेने जपली जात आहे. आपली मुले परदेशात वाढत असली, तरी त्यांच्या मनात महाराष्ट्राचा इतिहास, मराठी भाषा, सण-उत्सव आणि शिवरायांच्या विचारांविषयी प्रेम व अभिमान निर्माण व्हावा, या उदात्त भावनेतून दोन्ही कुटुंबीयांनी हा उपक्रम साकारला. त्यामुळे ‌‘वेरिंगड‌’ हा केवळ मातीचा किल्ला न राहता नव्या पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देणारा संस्कारांचा दीपस्तंभ ठरला आहे.

परदेशात राहूनही शिवइतिहासाची ओढ
या किल्ल्याची माहिती परिसरातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचताच धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक मराठी कुटुंबीयांनी आवर्जून भेट देत किल्ल्याचे कौतुक केले. परदेशात राहूनही आपल्या सणांची, परंपरांची आणि शिवइतिहासाची ओढ मनात किती जिवंत आहे, याचे दर्शन या भेटींमधून घडले. मराठी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पवार आणि कोळंबकर कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.
Exit mobile version