। माथेरान । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी भारावून गेलेल्या वातावरणात शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात प्रशिक्षक यांनी लाठी-काठी फिरविण्याची कला शिकण्यास सुरुवात केली. या शिबिराला चिमुकल्यांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्बादेवी युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण कांदळगावकर, कुकिवॉन चीफ मुंबई ताएकवोनडू हार्दिक उनडकर, लाठी काठी प्रशिक्षक वस्ताद सुधीर कांबळे, प्रेमलक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिपेश गावंड, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनजीत कौर यांच्या उपस्थितीत शिवकालीन लाठीकाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण क्रीडा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रेम लक्ष चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्रेमा लक्ष्मण विद्यालय संलग्न शिवशंभू मर्दानी अखाडा यांच्या वतीने शिबिराचे आयोजन केले. शिबिरात बनाटी, बाणा, ढाल तलवार, दाण पट्टा, चौकड, भाला, खंजीर, तोफ तलवार, डबल बनाटी, डबल पट्टा, सांबर शिंगे, सिलंबंम, अष्टूडो आखाडा अशी विविध शस्त्रास्त्रे चालवण्याची माहिती प्रशिक्षक सुधीर कांबळे यांनी दिली.