| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.4 मधील उतेखोल गावासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरलेला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी शिवा विनोद मोरे यांनी भारतीय सैन्य दलात म्हणजेच इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे. कठोर परिश्रम, अथक मेहनत, शिस्तबद्ध तयारी आणि देशसेवेची प्रबळ जिद्द यांच्या बळावर शिवा यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अहमदनगर येथे पार पडलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत तब्बल 100 जागांसाठी सुमारे 2 हजार 500 उमेदवार मैदानात उतरले होते. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक असलेल्या या प्रक्रियेत शिवा मोरे यांनी 200 पैकी तब्बल 182 गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. सध्या ते पुणे येथील वाडिया महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच देशसेवेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सातत्याने सराव आणि तयारी केली होती. लहानपणापासूनच भारतीय सैनिक बनण्याची तीव्र इच्छा मनात बाळगणाऱ्या शिवा यांनी अनेक अडचणींवर मात करत स्वतःला सिद्ध केले. शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, कठोर शिस्त आणि अथक सराव यांच्या जोरावर त्यांनी सैन्य भरतीची कठीण परीक्षा यशस्वीरीत्या पार केली. त्यांच्या या यशामुळे माणगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे मोरे कुटुंबाची ही चौथी पिढी देशसेवेसाठी सैन्यात दाखल होत आहे. त्यामुळे या यशाला केवळ वैयक्तिक यशाचे नव्हे, तर घराण्याच्या देशभक्तीच्या परंपरेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवा यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच सैनिक होण्याची प्रेरणा दिली आहे.







