शिवाजी पार्क म्हटले की शिवसेनाच; शरद पवारांचे स्पष्ट मत

| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

शरद पवारांनी संजय राऊतांना वार्‍यावर सोडलं असा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. कारण राऊतांना अटकही त्यांनीच केली अन् आरोपही तेच करतात. त्याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊतांना त्यांनीच अटक केली त्यामुळे कुणी वार्‍यावर सोडलं हे वेगळं सांगायची गरज नाही असं पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर कोण आरोप करतंय त्याची नोंद आपण घेतली पाहिजे असंही ते म्हणाले.

एकत्र येण्याची इच्छा
2024 च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये, असं पवारांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं जाही केल्यासंबंधी विचारलं असता, आमच्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे सोनिया गांधी, शरद पवार यांच्या नादी लागून बिघडले अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता, कोण बोलतंय, कोण आरोप करतंय याची नोंद घेतली पाहिजे,असा टोला लगावला.

पवारांना धमकीचा फोन
पवार यांना आज सकाळी धमकीचा फोन आला होता. पवार यांचा आज सोलापूरच्या कुर्डूवाडीत नियोजित दौरा होता. या दौर्‍यावर पवारांनी येऊ नये, अशा आशयाचा कॉल त्यांना आला. फोन करणारी व्यक्ती कोण आहे? त्याने ही धमकी का दिली? याची माहिती सध्या समोर येऊ शकलेली नाही, पोलिस त्याची चौकशी करतायेत. पण शरद पवार यांनी धमकीला भीक न घालता आपला नियोजित कुर्डूवाडी दौरा पूर्ण केला.

Exit mobile version