रामशेज किल्ल्यावरुन शिवज्योत पोहचली नेरळला

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील शिवप्रेमी तरुण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत दौड यात्रा केली जाते. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून निघालेली शिवज्योत दौड दोन दिवसांनी नेरळ येथे सोमवारी (दि.21) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी पोहचली. 180 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या शिवज्योत दौडीचे स्वागत करण्यासाठी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेरळ येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे 56वे वर्षे असून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून शिवज्योत दौड नेरळ येथे सकाळी पोहोचली. श्याम कडव,जीवन भोईर, प्रथमेश देशमुख, राहुल साळुंके, चिन्मय पवार, भूषण भोईर, कुणाल कांबरी, वेदांत शिंदे, रुपेश चव्हाण, निखिल खडे, भावेश भोईर, किरण भोईर, सुदर्शन भोईर हे सर्व तरुण दि.19 मार्च रोजी नेरळ गावातून नाशिक जिल्ह्यातील रामशेज येथे पोहोचले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य राहिलेल्या रामशेज या किल्ल्यावर सर्व तरुण सायंकाळी पोहचले होते आणि गडकिल्ल्याचे निरीक्षण करून सायंकाळची शिवआरती करून हे सर्व तरुण शिवज्योत प्रज्वलित करून नेरळ येथे निघाले. त्यावेळी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील तरुण देखील शिवज्योत घेण्यासाठी आले होते. दोन्ही शिवज्योत रामशेज किल्ल्यावरून रायगड जिल्ह्याकडे निघाल्या.

दोन दिवसाने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी नेरळ येथे सकाळी पोहोचली. त्यावेळी नेरळ गावातील असंख्य नागरिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते. नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल भाटकर तसेच सर्व पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यावेळी समितीचे कार्यकर्ते तसेच नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version