किल्ले रायगडावर शिवरायांचा जयघोष

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
महाड | वार्ताहर |
जय भवानी,जय शिवाजी असा जयघोषात शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत किल्ले रायगडावर बुधवारी( 23 जून) तिथीनुसार 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा 20 ते 30 जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. कोकणकडा मित्रमंडळ महाड, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा यूट्यूब तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवला गेला व शासनाच्या नियमानुसारच हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आ.भरत गोगावले, युवा सेनेचे विकास गोगावले, कार्यकारी समिती अध्यक्ष श्री नितीन पाऊल,कार्याध्यक्ष परेश सोनावळ,संस्थापक अध्यक्ष कोकणकडा मित्रमंडळाचे सुरेश पवार, निखिल शिंदे श्रीकांत फाऊंडेशनचे आणी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सिद्धेश पाटेकर नगरसेवक चेतन पोटफोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्याभिषेक दिनोत्सव समितीचे प्रमुख श्री सुनील पवार यांनी आपल्या छोटेखानी मनोगतामध्ये सांगितले की ,आजच्या हिंदू तिथी प्रमाणे साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिनास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी यांनी 5 लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्त केला आहे. तसेच दरवर्षी तशी रक्कम देणार असून त्यांना हिंदू तिथीप्रमाणे होणारा सोहळा बघायचा आहे व रायगडावर येणार असल्याची माहिती दिली.

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होताना आपणासाठी हा सोहळा पंढरीर्‍या वारीसारखाच आहे. महामारीच्या काळातून पुढील वर्षी या सोहळ्याला हजारो शिवभक्त उपस्थित राहतील यासाठी सर्व शिवभक्तांनी मिळुन प्रयत्न करूया
आ.भरत गोगावले

Exit mobile version