सलग पाचव्या दिवशी शिवकर ग्रामस्थांचे उपोषण सुरू

। पनवेल । वार्ताहर ।
शिवकर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सोमवारी (दि.6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सरपंचांसह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरूच होते.
उपोषणकर्त्यांकडून गावठाण विस्तार, सिडको/नैना प्रकल्प रद्द करणे, वनखाते, गुरचरण, जमीन, शेतघरातील घरांची बांधकामे नियमित करणे, रेडिरेकनरचा कमी केलेला दर पुर्ववत करणे व ग्रामपंचायतीचे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार व इतर सर्व अधिकार काढलेले आहेत ते पुन्हा नियमित करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला थोडा वेळ द्यावा व तोपर्यंत उपोषण स्थगित करावे अशी उपोषणकर्त्यांना त्यांनी विनंती केली व जिल्हाधिकारी यांच्या कानावर आपल्या मागण्या घालून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी तुमची ताबडतोब बैठक लावतो असे उपोषणकर्त्यांना तहसीलदार विजय तळेकर यांनी आश्‍वासन दिले.
या चर्चेवेळी नैना प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष संघटनेचे नेते अ‍ॅड.सुरेश ठाकूर, उपोषणकर्ते सरपंच अनिल ढवळे, नरेश भगत, सखाराम पाटील, कुमारी निकिता पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर लाड, सामाजिक कार्यकर्ते व शिवकर मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या बरोबर उपोषण कर्त्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी (दि.13) बैठक लावल्याची माहिती पनवेलचे तहसिलदार यांनी दिली.

Exit mobile version