तालुका प्रमुखपदाचा तिढा मात्र कायम
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात शिवसेना संघटनेत काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी व तालुक्यातील शिवसैनिकांची मत जाणून घेण्यासाठी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन येथील कुणबी समाज सभागृह येथे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीस आम्ही सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून, कायम मातोश्रीच्या पाठीशी आहोत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेश पाळणार, असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. बैठकी वेळेस शहरातील विकासकामे होतं नाही ही खंत व्यक्त करत शिवसैनिकांनी वरिष्ठ पदाधिकारी तालुक्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. या बैठकीस माजी आमदार तुकाराम सुर्वे, उपतालुकाप्रमुख अरूण शिगवण, तालुका महिलाध्यक्ष दिक्षा टाकळे, बाबुराव चोरगे, अविनाश कोळंबेकर, सुरेश मांडवकर, उपशहरप्रमुख जुनैद दुस्ते, अनंत गुरव व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीवर्धन तालुकाप्रमुख पद हे काही दिवस रिक्त असून, त्या पदावर नियुक्ती होत नसल्यामुळे शिवसैनिकांत मरगळ आली आहे. शिवसैनिकांच्या मते माजी आमदार व संपर्क प्रमुख तुकाराम सुर्वे यांनी पुढाकार घेऊन तालुकाप्रमुख पदावर स्वकीयांचा विचार न करता तालुक्यातील शिवसेना संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणार्या व्यक्तीला तालुकाप्रमुख हे महत्त्वाचे पद द्यावे. शहरातील काही शिवसैनिक शिंदे गटाकडे आकृष्ट झाले आहेत, त्या शिवसैनिकांचे मन वळवण्याची जबाबदारी तालुक्यातील पदाधिकार्यांनी घेऊन तालुक्यातील संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे.
अन् शिवसैनिक अनुत्तरित झाले
आ. आदिती तटकरे पालकमंत्री असताना पालकमंत्री हटाव ही भूमिका जेव्हा आ. भरत गोगावले यांनी घेतली होती. त्या वेळेस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी गोगावले यांना पाठिंबा दिला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले हेच असावे, या मतावर ठाम होते. परंतु, आता शिंदे सरकारमध्ये असलेले गोगावले यांना कदाचित पालकमंत्रीपद दिले तर शिवसैनिक त्यांना स्वीकारणार का? या मुद्द्यावर शिवसैनिक अनुत्तरित झाले आहेत.
नियमानुसार उपतालुकाप्रमुख पद सांभाळणारे अरुण शिगवण ह्यांचीच तालुकाप्रमुख पदावर नियुक्ती व्हावी. सेनेत प्रवेश करणार्यांनी अगोदर पाच वर्षे शिवसैनिक म्हणून काम करावे, मगच पदाची अपेक्षा ठेवावी.
दामोदर पाटील, दिघी विभागप्रमुख