। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद टोकाला पोचले असल्याचे पुन्हा एकदा उसर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी दिसून आले. या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविल्यामुळे हा संघर्ष चव्हाट्यावर आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमीपूजन समारंभावर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी बहिष्कार घातला. त्यामुळे आमदारांचा बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सेनेचे आमदार किती वैतागले आहेत, हेच त्यांच्या अनुपस्थितीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.पालकमंत्री आदिती तटकरे आणि खा. सुनील तटकरे यांच्यावरील आमदारांची नाराजी पुन्हा समोर आली आहे.
उसर येथे 52 एकर जागेत जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारत आहे. यासाठी राज्य शासनाकडून 406 कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे. उसर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली भुमीपूजन सोहळा संपन्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाईन तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे आमदार, शिवसेना पदाधिकारी कोणीच उपस्थित राहिले नाहीत.
महाडचे आ. भरत गोगावले, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे, अलिबागचे आ. महेंद्र दळवी हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार आहेत. काही दिवसापांसून शिवसेनेने पालकमंत्री हटाव भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. उसर येथील भुमीपूजन कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच आमदारांची नावे टाकली असून आमंत्रणही देण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या तीनही आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून महाविकास आघाडीत बिनसले असल्याचे चव्हाट्यावर आणले.