। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.7) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे आणि आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांसोबत तात्काळ मदत कार्य सुरू केले. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र, या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या भीषण दुर्दैवी अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू आहे.