चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप
। अकोला। वृत्तसंस्था।
शेगावकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आग लागली. हि घटना खामगाव-अकोला मार्गावर गुरुवारी (25) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या बसमध्ये 44 प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.
महामार्ग क्रमांक सहावर तुषार हॉटेलजवळ शेगावकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या बसमध्ये 44 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याची बाब लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब लागले, मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे.