लालपरी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन आगाराकडून मुंबई विभागाकडे जाणाऱ्या बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. मुंबईकडे मार्गस्थ होत असणाऱ्या अनेक बसेसपैकी साध्या गाड्या बंद करून त्या ठिकाणी वातानुकूलित शिवशाही व प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सुखसोयींनीयुक्त अशी विनावातानुकूलित स्लीपर कोच सोडण्यात येत आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुखसोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या बसेसच्या भरमसाठ तिकीट दरांमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली असून, या मार्गावर साध्या बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.
श्रीवर्धन स्थानकातून मुंबई, नालासोपारा, बोरीवली आणि पुणे या मार्गावर अनेक वर्षे साध्या बसेस सोडण्यात येत होत्या. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी या उद्देशाने 2017 सालात शिवशाही बससेवा सुरू केली आणि स्लीपर कोच बस सेवा 2019 सालात सुरू करण्यात आली. श्रीवर्धन आगाराकडे आधुनिक बसेस उपलब्ध झाल्यावर या मार्गावरील काही साध्या बसेस बंद करून त्या ठिकाणी शिवशाही व स्लीपर कोच बसेस सुरू करण्यात आल्या. साध्या बसच्या तुलनेत स्लीपर कोच बसच्या माध्यमातून राज्य परिवहनला प्रतिकिलोमीटर सत्तावीस रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवशाही बसचे हे उत्पन्न प्रतिकिलोमीटर सत्तेचाळीस रुपये इतके आहे. राज्य परिवहन मंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असली सामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे.
शिवशाही बसची वातानुकूलित यंत्रणा सुरू झाल्यावर गाडीचा वेग कमी होतो. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक रस्ते हे घाट रस्ते आहेत. घाटात बस योग्य वेगात चढण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काही वेळासाठी बंद करावी लागते, वातानुकूलित यंत्रणा बंद केल्यास प्रवासी वर्ग उकाड्याने घामाघूम झाल्यावर चालकाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. स्लीपर कोच बसेसचे अनेक पंखे बंद, आसनांची दुरवस्था यामुळे प्रवाशांना जास्त तिकीट भाडे देऊनसुद्धा प्रवासाचे समाधान मिळत नाही.
बसेसचे तिकीट दर
श्रीवर्धन मुंबई-साधी गाडी. 338/- स्लीपर 443/- शिवशाही 487/-.
श्रीवर्धन बोरिवली- साधी गाडी. 358/- स्लीपर 412/- शिवशाही 531/-
श्रीवर्धन नालासोपारा -साधी गाडी. 418/- स्लीपर 556/-







