। पनवेल । प्रतिनिधी ।
शिवशंकर मंडळ-कल्याण-ठाणे, गोलफादेवी मंडळ-मुंबई शहर, दसपटी मंडळ-चिपळूण-रत्नागिरी, जॉली स्पोर्ट्स-उपनगर, मिडलाईन स्पोर्ट्स-रायगड, बंड्या मारुती-मुंबई शहर, विजय क्लब-मुंबई शहर, स्वस्तिक मंडळ-उपनगर यांनी जय भवानी नवतरुण मंडळ आयोजित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरी गाठली.
तळोजा, पनवेल येथील धरणा कॅम्प येथील मैदानावरील मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील ड गटात उपनगरच्या स्वस्तिक मंडळाने मुंबई शहरच्या विजय क्लबला 36-35 असे चकविल्यामुळे या गटातील तीन संघाचे 4-4असे समान साखळी गुण झाले. त्यामुळे कोणते दोन संघ बाद फेरीत दाखल होणार हे ठरविण्यासाठी कबड्डीतील नियमानुसार मिळविलेले आणि गमावलेले गुण यातील फरक काढून निर्णय घेण्यात आला. त्यात विजय क्लबचे अधिक 28 गुण, स्वस्तिक मंडळाचे अधिक 03 गुण, तर शिवाजी व्यायाम मंडळाचे उणे 25गुण असा फरक आला. यानुसार विजय क्लब प्रथम, तर स्वस्तिक मंडळ द्वितीय ठरत बाद फेरीत दाखल झाले.
अ गटात शिवशंकरने गोलफादेवीला 32-23असे पराभूत करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली. ब गटात दसपटीने साखळीतील शेवटच्या सामन्यात जॉली स्पोर्ट्सचा 37-32 असा पराभव करीत सलग तिसरा विजय मिळवीत बाद फेरी गाठली. क गटात बंड्या मारुतीने जय हिंद मंडळाला 32-28 असे चितपट करीत दुसर्या विजयासह बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.






