तालुका चिटणीस सुरेश घरत यांचा कंपनीला इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
युरिया खत निर्मिती करणाऱ्या थळ येथील आरसीएफ कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. कंपनीच्या या भूमिकेविरोधात शेकापचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्या. त्याची कार्यवाही तातडीने करा, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आरसीएफ कंपनीच्या प्रशासनाला गुरुवारी (दि.25) निवेदन दिले आहे.
आरसीएफ कंपनी ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. थळ येथे गेल्या अनेक वर्षापासून युरिया खत निर्मितीचा प्रकल्प आहे. या कंपनीत तालुक्यातील अनेक भागातील तरुण कंत्राटी स्वरुपात कामगार म्हणून काम करीत आहेत. तुटपुंज्या वेतनावर या कामगारांना राबविले जात आहे. ठेका बदलल्यावर जून्या कंत्राटी कामगारांना काढून नवीन कामगार घेतले जात आहे. यामुळे कार्यरत असलेल्या कामगारांवर मोठे आर्थिक संकट उभे राहत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भिती आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार पुर्णपणे चुकीचा आहे. कंपनी प्रशासनासह ठेकेदारांच्या या कारभाराबाबत शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी आवाज उठविला आहे. कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, कंत्राटदार बदलल्यावर जून्या कामगारांना काढण्याची पध्दत चुकीची आहे. याची जाणीव सुरेश घरत यांनी निवेदनाद्वारे दाखवून दिली आहे. योग्य ती कार्यवाही करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सुरेश घरत यांनी निवेदनाद्वारे गुरुवारी केली.







