| कोलाड | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एमडीएन स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून व विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून उत्साहात साजरी केली. शिवजयंती निमित्त आंबेवाडी प्राथमिक उपचार केंद्र ते मराठा पॅलेस यादरम्यान शोभायात्रा काढून व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकरून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. सकाळी नऊ वाजता शोभायात्रा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यानी विविध घोषणांनी शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविले. आंबेवाडी नाका येथे भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता सहावीचा विद्यार्थी पार्थ शिंदे हा शिवगर्जना देण्यासाठी आला व आपल्या बुलंदी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची झालेली भेट हा रोमहर्षक प्रसंग इयत्ता सातवीचा विद्यार्थी श्रीश केळुसकर व त्याचे सवंगडी यांनी बुलंद आवाजात पोवाड्याच्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर केला. तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर सुद्धा रोमांच उठले असतील असा आवाज गगनभेदी होता.