| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी ।
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मुरुड शहरात ‘महावीर जयंती’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. कडक उन्हं असल्याने सकाळी लवकर जैन मंदिरामध्ये भगवान महावीरांच्या मूर्तीला अभिषेक व विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर, फुलांनी सजवलेल्या एका भव्य रथातून भगवान महावीरांच्या सुवर्णमयी मूर्तीची नगरपरिक्रमा काढण्यात आली. या रथाला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. मुरुड पोलीस निरीक्षक कांबळे यांनी महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शिस्तबद्ध आयोजन
पुरुष भाविकांनी पांढऱ्या वेशभूषेत मिरवणुकीची शोभा वाढवली. स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी वाहतुकीचे चोख नियोजन केले होते. 'जिओ और जीने दो' (जगा आणि जगू द्या) हा महावीरांचा शांततेचा संदेश या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यात आला.
