| अकोला | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना अचानक अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या दबावाला कंटाळून शहर आणि ग्रामीणमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कमी वयात अनेक राजकीय पदे भूषविणारे शिवा मोहोड यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
सोमवारी 22 एप्रिल रोजी अमरावती येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. दरम्यान त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. मिटकरींना असेच पाठीशी घातले तर अनेक जण रामराम ठोकतील असा इशाराही दिला आहे.
तेथे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची योग्य दखल आमदाराच्या दबावामुळे घेतल्या गेली नाही. शिवाय ज्यांच्यात कोणतीही निवडणूक लढविण्याची किंवा निवडून येण्याची क्षमता नाही अशा लोकप्रतिनिधींमुळे त्यांना अनेक खोट्या आरोपांना आणि अडचणींना सामोरे जावे लागले. विकास निधीमध्ये अडथळे येऊ लागले, असे सांगून त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याकडे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी त्यांनी अमरावती येथील एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खा. अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनात तसेच आ. नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे आता शहरी व ग्रामीण भागात शिवसेना उबाठा पक्षाची ताकद आणखी वाढणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.