महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

30,371 ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वीज सेवा सुरळीतपणे पुरवूनही अनेक ग्राहकांकडून वेळेवर वीज बिलाचा भरणा होत नसल्याने महावितरण कंपनीच्या महसुलावर ताण येत आहे. थकीत बिलांची वाढती रक्कम लक्षात घेता महावितरणने कडक कारवाईचा अवलंब करत गेल्या 4 महिन्यांत 30 हजार 371 ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित केले आहेत.

रायगड सर्कल अंतर्गत अलिबाग, पनवेल, रोहा आणि गोरेगाव हे चार विभाग असून, त्याअंतर्गत 17 उपविभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज पुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते. दर महिन्याला वापरानुसार ग्राहकांना बिल वितरित केले जाते. काहींना ऑनलाईन माध्यमातून तर काहींना कागदी स्वरूपात बिल दिले जाते. मात्र, काही ग्राहकांकडून सातत्याने बिल भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत नोव्हेंबरमध्ये 9,965, डिसेंबरमध्ये 6,286, जानेवारीमध्ये 6,650 आणि फेब्रुवारीमध्ये 7,580 अशा एकूण 30,371 ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी केले आहे.

वीजचोरांवर धडक कारवाई
जिल्ह्यात वीजपुरवठ्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले असतानाही काहीजण अनधिकृतरित्या वीज वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात महावितरणने वीज चोरीविरोधात विशेष मोहीम राबवून 324 प्रकरणे उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे 99 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 72 जणांनी 43 लाख रुपयांचा भरणा केला असून उर्वरित 252 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. वीजचोरीमुळे महसुलाचे नुकसान होऊन प्रामाणिक ग्राहकांवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्यामुळे अनधिकृत वापर टाळून कायदेशीर मार्गानेच वीज घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
Exit mobile version