महावितरणकडून होणार गुन्हा दाखल
चोरुन वीज घेणं पडणार महाग
ग्रामीण भागातील 51 घटना उघडकीस
पाली / राबगाव | वार्ताहर |
घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यावर शेजारच्या घरातून वीज घेत असाल तर तुमच्यावर भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या घरातील वीज जर दुकानासाठी वापरली जात असेल तरीही आपल्यावर या कायद्यानुसार महावितरणकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे नकळत होणार्या चुकांमुळे अडचणीत येण्याची वेळ येऊ शकते.
वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच वीज चोरीचे प्रकारही वाढले आहेत. वीजचोरांवर विद्युत कायद्यानुसार दंड व गंभीर शिक्षाही होऊ शकते. वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी व दोषींवर कारवाई करण्यासाठी महावितरणाच्या पाली कार्यालयामार्फत ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान केलेल्या कारवाईत ग्रामीण भागात जवळपास 51 प्रकरणांत कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. वीजचोरी पकडल्यानंतर ग्राहकांना वीजचोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. तसेच बिल न भरल्यास संबंधितांवर गुन्हाही दाखल होऊ शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेजार्याकडून वीज घेतली तर महागात पडेल.
वीजचोरी कळवा आणि बक्षीस मिळवा
वीजचोरीच्या वाढत्या प्रकरणामुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ’वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा, असा उपक्रम हाती घेतला आहे.
वर्षभरात झालेली कारवाई व वसूल केलेला दंड
प्रकरणे युनिट चोरी दंडवसुली
126 अन्वये .. 01.. 5737.. 38830
935 अन्वये. 50. 31552. 557300
एकूण 51. 37289 6,41,130
महावितरणच्या सुधागड पाली उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणार्या शहर व ग्रामीण भागात वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. वीज ग्राहकांनी मीटर मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, तसेच आकडे टाकून अनधिकृत विजेचा वापर करु नये.
जतीन पाटील, उपविभागीय अभियंता, महावितरण सुधागड-पाली