असंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन मुरूड तालुक्यातील मजगावमधील असंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांनी रविवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला दणका मिळाला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आशिष देशपांडे, माजी सभापती चंद्रकांत कमाने, महेश पाटील, संतोष जमनू, नानाशेठ पाटील, शांताराम मानकर, जनाब फिरफिरे आदी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मजगावमधील असंख्य मुस्लीम समाज शिंदे गटात कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. मात्र, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नव्हती. शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला ही मंडळी कंटाळली होती. विशेष करून तरुण मंडळींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेकापचे आशिष देशपांडे यांच्या पुढाकाराने मजगावमधील असंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे लाल मफलर देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी शेकापला पाठिंबा देत या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊ, असे आश्वासन दिले. ऐन निवडणुकीत शिंदे गटातील अनेक कार्यकर्ते शेकापमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटाला दणका मिळाल्याचे चित्र आहे.