आंतरराष्ट्रीय संघटनेकडून पाकिस्तान हॉकी संघटनेला धक्का!

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

तब्बल 19 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यजमान पदासाठी सज्ज होत असलेल्या पाकिस्तान हॉकी संघटनेला जोरदार धक्का बसला. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने त्यांच्याकडून यजमानी काढून घेतली आहे.पाकिस्तान हॉकी संघटनेच्या कामकाजावरून आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून कठोर निर्णय घेण्यात आला. याआधी 2004 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यायी ठिकाणाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून पत्रकाद्वारे याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगण्यात आले की, 2024 मधील जानेवारी महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. पाकिस्तान हॉकी संघटनेतील वादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर दोन पात्रता फेरी चीन व स्पेन येथे होणार आहेत.

पाकिस्तानसमोर आव्हान
पाकिस्तानचा संघ जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर आहे. आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यास पाकला पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक करता येईल.

नऊ देशांना पात्र ठरता येईल
तीन ठिकाणी पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीच्या लढती होणार आहेत. प्रत्येक पात्रता फेरीमधून तीन देश ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच तीन पात्रता फेरींमधून एकूण नऊ देश ऑलिंपिकमध्ये सहभागी होतील.

Exit mobile version