। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीने विवाहित पुरुषाच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीने तिला सतत फोन करून “माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी बदनामी करीन, कॉलेजमध्ये सांगीन, तुला जगू देणार नाही” अशा धमक्या दिल्या. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.”
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी मुरुड येथील स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच गावातील आरोपी हा विवाहित असून सुद्धा तक्रारदार यांच्या मयत मुलगी हिच्याशी सतत फोन आणि चॅटद्वारे संपर्क साधत होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही, त्याने तिच्याशी अनुचित संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मयत मुलीने संवाद टाळल्यानंतर आरोपीने तिला सतत फोन करून “माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी बदनामी करेन, कॉलेजमध्ये सांगीन, तुला जगू देणार नाही”, अशा शब्दांत धमक्या दिल्या.
या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सखोल तपासानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, “मोबाइलच्या मागे लपलेला सायबर छळ आता थेट जीव घेतोय” अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. स्थानिकांनी अशा प्रकरणांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.






