‘त्या’ पोलिसांची चौकशी होणार का?; जप्त केलेल्या बनावट नोटा व्हायरल
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यात लाखो रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी भूषण पतंगेचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आज शुक्रवार दि.17 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. परंतु, पोलिसांनी हा आरोप खोडून काढला असून, आरोपीला फीट येण्याचा गंभीर आजार होता, त्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. परंतु, बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी पोलिसांनी पतंगेचा गेम केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील बनावट नोटा तपासिक अधिकाऱ्याच्या लेकीकडून समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जप्त मालाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलिबाग शहरातील भूषण पतंगेच्या घरातून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा लाखो रुपयांचा साठा अलिबाग पोलिसांनी जप्त केला होता. ही कारवाई शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबरदरम्यान अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यानच्या काळात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. परंतु, त्याला फीट येण्याचा गंभीर आजार असून, सीटीस्कॅन करण्यासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते, तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन होत नसल्याचे कारण पुढे केल्याने पुन्हा एकदा आरोग्य सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
दरम्यान, भूषणच्या नातेवाईकांनी त्याला चौकशीदरम्यान पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच तो दगावल्याचा आरोप केला. भूषणच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे यांच्याकडे होता. तर, चौकशीदरम्यान आरोपी भूषण पतंगेची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु पुरेशी यंत्रणा नसल्याने त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अधिकचे गौडबंगाल काय आहे, याची कृषीवल पुराव्यानिशी उद्याच्या अंकात पोलखोल करणार आहे.

जप्त केलेल्या नोटांबाबत निष्काळजीपणा
या प्रकरणात जप्त केलेल्या नोटा आज तपासिक अधिकारी म्हणून काम पाहणारे दिपक मोरे यांच्या कायद्याचे ज्ञान असणाऱ्या लेकीकडून समाजमाध्यमात व्हायरल झाल्या आहेत. न्यायप्रविष्ठ प्रकरणात अशा पद्धतीने वागून आपले अज्ञान जगासमोर दाखवणाऱ्यांबद्दल आता उलटसुटल चर्चा सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे यांना जप्त केलेली संपत्ती खेळण्यातील वाटली का? कारण, ज्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, त्या खेळण्यातील आहेत, याच पद्धतीने आपल्या मुलीला खेळायला तर दिल्या नाही ना, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कारण, त्याच बनावट नोटांसोबत त्या मुलीने आपले फोटो समाजमाध्यांवर टाकले असून, ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. कायद्याचे रक्षक समजणारे आणि कायद्याचे ज्ञान असणाऱ्यांना याचे जरासुद्धा गांभीर्य कळू नये, याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. जप्त केलेला माल हा संवेदनशील विषय असून, याचे भान असणे आवश्यक होते. परंतु, अशा प्रकारे त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, याच अधिकाऱ्याला भोवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अशा प्रकारे मुलीचे लाड पुरवणाऱ्या पोलीस पित्यावर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पावधीत नाव कमावलेल्या रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल काय कारवाई करणार, याकडे तमाम रायगडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरोपीला बेदम मारहाण?
भूषण पतंगेला पोलिसांचा खबऱ्या ‘कादर' याने पोलीस कोठडीत मारहाण केल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. अटक करण्यात आल्यावर आरोपीची रुग्णालयात तपासणी होते. परंतु, त्यावेळेस तो चांगला हिंडता-फिरता होता. परंतु, अचानक असे काय झाले? त्याचा असा कोणता आजार एकदम बळावला की त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार होऊ शकले नाहीत? त्याला तात्काळ मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांचा हा सर्व खटाटोप नाही ना? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस ...
कायदा पोलिसांना पोलीस कोठडीत किंवा चौकशीदरम्यान लोकांना जीव जाईपर्यंत मारहाण करण्याची परवानगी देत नाही. कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची शिक्षा कायद्याच्या न्यायालयाद्वारे निश्चित केली आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आहेत, निवाडा करण्यासाठी नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींकडून कधीही उदासीनता किंवा अतिप्रतिक्रियेत एखादी दुर्घटना घडू नये, असे न्यायालय सांगते, कायदा सांगतो.
पुरावे नष्ट होण्याची शक्यता
पोलिसांनी जप्त केलेला माल अन्य कोणी हाताळल्यास पुराव्याचा नाश, बदल किंवा गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जप्त करण्यात आलेला माल न्यायालयीन देखरेखीत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, लेकीवरील प्रेमाखातर पोलीस पित्याने हे सर्व केल्याची चर्चा आहे. कारण, तसे नसेल तर तिथे जाऊन तिची बनावट नोटांसोबत फोटो काढण्याची हिंमत झालीच कशी? ती अशा संवेदनशील ठिकाणी पोहोचलीच कशी? हा मुद्दा आहेच.
भूषण पतंगेला याअधी 2019 मध्ये श्रीवर्धन येथील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला वैद्यकीय तपासणीत फीटचा आजार असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे आजाराची पार्श्वभूमी आधीपासूनच आहे. यावेळीसुद्धा चौकशीदरम्यान त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे







