धक्कादायक! महाडमध्ये दोघांची करामत; घटना सीसीटीव्हीत कैद

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहरातील तांबट आळीत भरवस्तीत असलेले दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना महाड शहर पोलिसांनी रात्री अटक केली.

ही घटना शनिवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या मुख्य शाखा इमारतीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न एक चोरटा करीत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्याने एटीएममधील यंत्रणा पूर्णपणे वाकवून तोडफोड केली. यंत्रणेची तोडफोड झाल्यानंतर बँकेशी असलेला त्याचा सिग्नल तुटल्याने बँक कर्मचाऱ्यांना ही बाब त्वरित लक्षात आली. त्यांनी याबाबत तातडीने एटीएम केंद्राशी संपर्क साधला. तत्पूर्वी एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्याने चोरट्याने पळ काढला. याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोष यादव यांनी त्वरित महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार निकेत वार्डे व शिपाई रामसेवक कांदे यांनी महाडमध्ये चोरांचा शोध सुरू केला असता, तळामध्ये रात्री दहाच्या सुमारास एका दुकानाजवळ दोन संशयित व्यक्ती वावरत असल्याचे आढळले.

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर दुसरा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु स्थानिक युवकांनी तत्परता दाखवत दुसऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांपैकी एकाचे नाव शराफत अजमत खान (रा. भरतपूर राजस्थान) असून दुसऱ्या चोरट्याचे नाव गुलाब इलियास खान (रा. मुबारकपूर हरियाना) आहे. दोघांकडून पोलिसांनी विविध बँकांची दहा ते बारा एटीएम कार्ड जप्त केली आहेत. या दोघांवर मुंबई व अन्य परिसरात एटीएम फोडीचे गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शहरात संतापाची लाट
महाडमध्ये महिन्याभरात लहान मोठ्या आठ ते दहा चोरीच्या घटना घडल्या आहेत. शहरात चोरट्यांचा वावर वाढल्याचे अनेकदा सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रणावरून दिसते. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशाराही दिला होता, परंतु तरीही शहरातील चोरीचे प्रकार थांबले नसल्याचे एटीएम फोडण्याच्या घटनेवरून समोर येत आहे. तांबट आळीसारख्या भरवस्तीमध्ये सायंकाळी झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट असून पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Exit mobile version