| वसई | प्रतिनिधी |
नालासोपाऱ्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून तिच्यावर चौघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना 17 जानेवारी रोजी घडली आहे.
पीडित मुलगी नालासोपारा पूर्वेला राहते. तिच्या परिसरातीच राहणाऱ्या अयान नावाच्या मुलाने तिला चांद पठाण या आरोपीच्या घरी नेले. तेथे अयान आणि चांद यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर चांद पठाण आणि अमीर अन्सारी यांनी तिच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या आणि तिला धमकी दिली की, जर तिने ही घटना कोणाला सांगितली तर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल. या धमकीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला सलमान खान (19) नावाच्या आरोपीने फोन करून तिच्या व्हिडिओचा उल्लेख करून ब्लॅकमेल केले आणि तिला आपल्या घरी बोलावले. तेथे सलमानने तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले. अखेर पीडित मुलीने गुरुवारी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (सामूहिक बलात्कार), पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8, 12 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पीडित मुलीच्या परिसरातीलच असून त्यांना शुक्रवारी वसई न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस रिमांडवर पाठवले आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करीत आहेत.