धक्कादायक! खातेदारांच्या अकाऊंटमध्ये आले चुकून कोट्यवधी रुपये

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सरकारी बँक असलेल्या युको बँकेच्या खातेदारांच्या खात्यात एकूण 820 कोटी रुपये जमा झाले; परंतु, हे पैसे चुकून जमा केले गेल्याचे बँकेच्या लक्षात आले. ही चूक बँकेने कबूल करून आता ही रक्कम जमा झालेल्या प्रत्येक खातेदाराच्या खात्यातून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

खातेदारांच्या खात्यांत 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या काळात इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) प्रणालीच्या साह्याने वरील रक्कम हस्तांतरित केली गेली. आयएमपीएस प्रणालीचे व्यवस्थापन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) केले जाते. 10 ते 13 नोव्हेंबर या काळात पैसे हस्तांतरित होण्याचा झालेला प्रकार हा तांत्रिक दोषामुळे झाला, मानवी चुकीमुळे हा प्रकार झाला किंवा काही वेगळे कारण होते हे मात्र, बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

आयएमपीएस अंतर्गत अन्य बँकांच्या खातेदारांचे पैसे युको बँकेच्या खातेदारांच्या खात्यात जमा होत असल्याचे बँकेच्या लक्षात आले. यामुळे अन्य बँकांकडून कोणत्याही प्रकारे अदायगी करत असल्याची पूर्वसूचना बँकेकडे आली नसतानाही अचानक पैसे खात्यांत जमा होत गेले.

सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर युको बँकेने त्वरेने हालचाली करून 820 कोटींपैकी तब्बल 649 कोटी रुपये खात्यांतून परत घेण्यात यश मिळवले आहे. बँकेने ही माहिती रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिली आहे. इतकी रक्कम हस्तांतरित होण्याचा हा सर्व प्रकार हॅकिंगमुळे झाला असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आता उर्वरित सुमारे 171 कोटी रुपये वसूल करण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version