। रेवदंडा | प्रतिनिधी ।
चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथील मंदा प्रमोद म्हात्रे (70) या वृद्ध महिलेचा चोरीदरम्यान खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून माहिती मिळताच रेवदंडा पोलीस, श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
काय घडले नेमके?
मयत मंदा म्हात्रे या सुमारे दहा वर्षांपासून माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी टेकाळकर आळी येथील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे गुंजीस, पो. नवगाव, ता. अलिबाग, जि. रायगड येथे वास्तव्यास आहेत.
२८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींचा फोनवर संपर्क झाला होता. मात्र, सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मंदा म्हात्रे यांचा फोन उचलला जात नसल्याने संशय बळावला. दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे आठ वाजता तक्रारदार प्रमोद म्हात्रे घरी आले असता घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
झटापटीचे स्पष्ट चिन्ह
पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत त्यांच्या डाव्या कानाखाली जखम आढळून आली असून मानेच्या उजव्या बाजूला दोन वळ (खुणा) दिसून आल्या आहेत. कानातील सोन्याच्या रिंगा व गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून जबरी चोरी करताना खून झाल्याचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव, दीपक म्हशीळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, कुंभार, सुग्रीव गव्हाणे, सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे. एकटी वृद्ध महिला हेरून घरात घुसून तिला मारण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






