| मुंबई | प्रतिनिधी |
पतीला भेटून घरी परतत असलेल्या एका वैमानिक महिलेचा खासगी टॅक्सीत तिघांनी विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि.19) रात्री मुंबईत घडली आहे. याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. महिला पायलटचा धावत्या कॅबमध्ये विनयभंग झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला एका खासगी विमान कंपनीत वैमानिक असून त्यांचे पती नौदलात अधिकारी आहेत. ते कुलाबा परिसरात काम करतात. त्या गुरुवारी रात्री पतीला भेटण्यासाठी कुलाबा परिसरात गेल्या होत्या. हॉटेलमध्ये रात्री 10 च्या सुमारास जेवण केल्यानंतर पतीने महिला पायलटसाठी कॅब बूक केली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर कॅब ड्रायव्हरने अचानक रस्ता बदलला. पुढे गेल्यानंतर त्याने कार थांबवली आणि दोन अन्य पुरुषांना कॅबमध्ये बसवलं. एक पुरुष पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला. तर दुसरा पुरुष मागे महिला पायलटच्या बाजूला बसला. दोन अनोळखी पुरुष मध्येत कारमध्ये बसल्यामुळे महिला पायलट घबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरु केली. अशात एका पुरुषांने ओरडू नकोस म्हणून धमकी दिली. तर अन्य एका पुरुषाने महिला पायलटला वाईट स्पर्ष केला. एवढं सगळ घडत असताना देखील ड्रायव्हर शांत बसून फक्त गाडी चालवत होता. सुदैवाने रस्त्यावर पोलिसांचा नाकाबंदी पाहून ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. तेव्हा दोन्ही पुरुष गाडीतून उतरले आणि फरार झाले. त्यानंतर ड्रायव्हरने महिला पायलटला घरी सोडलं. उतरल्यानंतर पीडित महिलेने ड्रायव्हरला जाब विचारला. पण तो काहीही बोलला नाही. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून, दोन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे. पोलीस सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.







