| कर्जत | वार्ताहर |
कर्जत शहरात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या महिलेला धमकावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्जतमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना बेड्या देखील ठोकल्या आहेत. आरोपी ठाकूरवाडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीने आधी पीडित महिलेबरोबर ओळख वाढवली. हळुहळू तिचा विश्वास देखील संपादन केला. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचे मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्र मागवले. पीडित महिलेने त्याला हे फोटो पाठवले. नंतर आरोपीने हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी देत तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने ते छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. नंतर इतर सहा आरोपींनी देखील पीडितेला छायाचित्र प्रसिद्ध करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.