संशयित पत्नीला ठोकल्या बेड्या
| खोपोली | प्रतिनिधी |
नवर्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने तो पहाटे साखरझोपेत असताना दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि. 23) खोपोलीतील शिळफाटा परिसरातील मीळ गाव नवीन वसाहतीत घडली. याबाबतची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अरसद अली (34) असे मयत पतीचे नाव आहे. पोलिसांनी कसून तपासाअंती संशयित पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शिळफाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असरद अली (34) हा उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर असून, अनेक वर्षांपासून शिळफाट्यावर वास्तव्यास असल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. सध्या तो शिळफाटा परिसरातील मीळ गाव नवीन वसाहतीत राहात होता. रविवारी पहाटे किंकाळीचा आवाज आल्यावर शेजारील लोक जागे होऊन बाहेर आले, तेव्हा त्यांना अरसदची पत्नी बाहेरील दरवाजात बसल्याचे दिसून आले. तर, मुलीचे हात रक्ताने माखलेले होते. दरम्यान, अरसदला जखमी असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमचे गुरूनाथ साठेलकर यांनी मिळताच ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. घरात जाऊन पाहणी करताच अरसदच्या डोक्यात दगड टाकल्याने तो रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. त्यानंतर गुरूनाथ साठेलकर यांनी सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात कळविताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरंबले पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केले.
तपास करताना पत्नीची विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण केले. श्वान सर्वत्र वास घेतल्यावर पत्नीजवळच जाऊन थाबंत होता. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत संशयित वस्तुंचे ठसे घेतले आहे. एलसीबीच्या अधिकार्यांंनी भेट देऊन तपासकार्य केले. अरसद अलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. सकाळपासून दुपारपर्यंत पोलिसांच्या सर्व यंत्रणेने तपास करीत भा.द.वि. कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.