| कोल्हापूर | प्रतिनिधी |
हातकणंगले येथे धार्मिक शिक्षण देणाऱ्या निजामीया मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांने अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला शॉक देऊन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. यामुळे प्रचंड दहशत माजली आहे. या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील हातकणंगले -वडगांव रस्त्यावर असलेल्या धार्मिक शिक्षण देणारं निजामीया मदरसा असून, तिथे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी हे परराज्यातील आहेत. घटना घडली त्या दिवशी अर्थात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून सर्व विद्यार्थी झोपी गेले. मात्र रविवार मध्यरात्र ते पहाटेच्या सुमारास 14 वर्षांच्या मुलाने 11 वर्षांच्या फैजान नाजीम, मुळ राहणार गमहरीय बिहार याला वीजेचा शॉक दिला आणि त्याचा खून केला.
सोमवारी पहाटे धार्मिक शिक्षण देणाऱ्या आळते येथील संस्थेत 11 वर्षीय परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली होती . मयत फैजानच्या अंगावर जखमेचे व्रण असल्याने हातकणंगलेतील ग्रामिण रुग्णालयाने त्याचा मृतदेह सिपीआर रूग्णालयाकडील फॉरेन्सीक विभागाकडे पाठवला, मात्र त्यामुळे गूढ वाढले होते. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी देखील आपला तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी पोलीसी तपासातून व फॉरेन्सीक विभागाकडून मिळालेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली. मृत विद्यार्थी फैजान याला विजेचा शॉक देऊन मारण्यात आलं अशी माहिती समोर आली. वारीस वकील आलम (14), रा. बिहार, सध्या निजामीया मदरसा, आळते या 14 वर्षांच्या मुलाने, निजामीया मदरशामधून बाहेर पडायचे आहे, या कारणावरून, रूम नंबर 2 मध्ये राहणाऱ्या फैजान नाजिम (11) या बालकाला विजेचा शॉक देऊन ठार मारले असे पोलीस तपासातुन समोर आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.






