| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांच्या ताफ्याला बुधवारी (दि.18) सकाळी अपघात झाला आहे. अपघातात मुबंई पोलीस दलातील 3 पोलीस उपनिरीक्षक आणि 11 अंमलदारांचा समावेश असून, नवी मुंबई पोलीस दलातील 4 अंमलदार असा 18 जणांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून, जखमीना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बांगलादेशी आरोपींना घेऊन जाणाऱ्या ताफ्याला झालेल्या अपघातात 12 बांगलादेशी आरोपी देखील जखमी झाले आहेत. या मध्ये 9 महिला, एक लहान मुल आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विविध मार्गाने अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी आरोपीना बुधवारी पोलिसांच्या वाहनातून पुण्याकडे नेण्यात येत होते. तीन बस आणि एक जीप असा समावेश असलेल्या पोलिसांचा हा ताफा मुंबई-पुणे दृतगती मार्गांवरील भातान येथील बोगद्यात आला असता एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे हायवे किलोमीटर 16 वर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाला होता. पलटी झालेला हा कंटेनर हायड्राच्या साह्याने काढण्याचे काम सुरु असताना एक आयशर टेम्पो काम करत असलेल्या हायड्राला येऊन धडकला त्यामुळे एक लेन बंद झाली व एकाच लेनने वाहतूक सुरु होती अचानक वाहतूक थांबल्याने किलोमीटर 10 या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसला पोलीस ताफ्यातील बस मागून येऊन धडकली व त्या मागे असलेल्या 2 पोलीस बस आणि त्यानंतर बसला एस्कॉर्ट करणारी स्कोर्पिओ जीप धडकली आहे. घुसखोरी करून भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीं नागरिकांविरोधात पोलिसांनकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मोहीम पोलिसांकडून राबवली जात आहे. अशाच मोहिमेतून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीना घेऊन पोलिसांचा ताफा पुण्याच्या दिशेला निघाला होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी तसेच एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल झाले होते.