धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून तिघांवर चाकूहल्ला

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांढवे बुद्रुक येथे शनिवारी (दि.14) संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या तिघा तरुणांवर आरोपीने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत आठ जणांविरोधात पोलिसांत हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील धारवली येथील युवक प्रथम संतोष सकपाळ (21) याने मागील राग मनात धरून चांढवे बुद्रुक गावातील उनित सुनील जाधव (23), विकास गौतम जाधव (32), दिपेश दीपक पवार (25) यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यातील जखमी उणीत जाधवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला महाड ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून मुंबई येथे हलविण्यात आले आहे, तर विकास जाधव व दिपेश पवार या दोन तरुणांवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

यामध्ये आरोपी प्रथम संतोष सकपाळ, संकेत संतोष सोनवणे, सनी भागुराम सकपाळ, प्रथमेश बायज्या सकपाळ, विकी भीमराव सकपाळ, सुजित सुनील सकपाळ, सुजल भागुराम सकपाळ, सनी महेंद्र सोनवणे अशा आठ जणांविरोधात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.

Exit mobile version