धक्कादायक! लक्झरी बसला अपघात

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर शहरातील अंडरपास आणि सर्व्हिसरोडच्या प्रवेशाठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत असून रविवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास एक सुस्साट व्हॉल्वो लक्झरी बस अंडरपासचा नॅशनल हायवे आणि पोलादपूरचा पुर्वेकडील सर्व्हिसरोडदरम्यानच्या काँक्रीट गटारावर चढल्याने पोलादपूरकरांची मोठया आवाजासह किंचाळण्याने झोपमोड झाली. या घटनेवेळी लक्झरी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे दिसून आले. मात्र, या आवाजामुळे पोलादपूरकर मात्र हवालदिल झाल्याचे दिसून आले.

मुंबईमधून आत्माराम ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो लक्झरी बस तळकोकणात गोव्याच्या दिशेने जात असताना रविवारी (दि.2) पहाटे 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलादपूर प्रभातनगर येथे आली असता हॉटेल गोल्डन पॅलेससमोरच्या सर्व्हिसरोड आणि महामार्गामधील काँक्रीटच्या गटारवजाफूटपाथवर तब्बल दीडशे फूट अंतरावर कर्णकर्कश आवाजासह चढली आणि या बसच्या डाव्या बाजूला मोठया प्रमाणवर नुकसान झाले. चालक जस्मीन सोहनी याचे व्हॉल्वो लक्झरीबसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस प्रथम हायवे आणि सर्व्हिसरोडमधील रस्ता दुभाजकाला धडकली. यानंतर व्हॉल्वो लक्झरीबस सुमारे 150 फूट अंतर दुभाजकाला घासत पुढे गेली. या घटनेमध्ये लक्झरीबसमधील 2 चालकांसह 49 प्रवासी सुदैवाने बचावले. यावेळी दुसरा चालक चांद रशीद शेख व्हॉल्वो चालक सोहनीच्या बाजूला बसला होता. या घटनेची माहिती समजताच सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलीस हवालदार बामणे, पोलीस हवालदार सूळ यांच्यासह स्थानिक नगरसेवक स्वप्निल भुवड व निखिल कापडेकर, अरूण पवार आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

प्रकाशासाठीच्या पोलवरील दिवे बंद
पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा पूर्व आणि पश्‍चिमेच्या सर्व्हिसरोडखालून जात असल्याने या हायवेवर प्रकाशझोत सोडण्यासाठी दोन्ही सर्व्हिसरोडच्या संरक्षक कठडयांजवळ पोल उभारून त्यावर स्ट्रीटलाईटची सुविधा एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने केली आहे. मात्र, हे स्ट्रीटलाईट गेल्या महिनाभरापासून पोलादपूर शहरामध्ये प्रवेश करताच बंद असल्याने अंडरपास हायवेवर काळोख पसरून हायवे कुठे आहे, असा प्रश्‍न सर्व्हिसरोड व अंडरपास हायवेजवळून जाणार्‍या वाहनचालकांना पडून अचानक कोणताही निर्णय घेता न आल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी अपघात सातत्याने घडत असल्यामुळे परिसरातील नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
Exit mobile version