धक्कादायक! काशीद किनारी बुडून आई, मुलाचा मृत्यू

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा फिरण्यासाठी आलेल्या आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे दोघेही कल्याण येथील रहिवाशी आहेत. चिकणी समुद्र किनार्‍यावरील कावडा नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात सदरची घटना घडली आहे.

डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) तर मुलगा विजय लिओनेल अल्फ्रेड (वय 46) हे पाण्यात पोहण्यासाठी गेले असता समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

दोघेही कल्याण येथील टीएमसी शाळेजवळ दहीघर गाव शिळासती येथील रहिवासी आहेत. त्यांच्या जवळ असणार्‍या आधार कार्ड वरून पोलिसांनी या पत्त्यावर चौकशी केली असता त्यांचे कोणतेही नातेवाईक आढळून आले नाहीत. त्यामुळे या दोघांचे शव वाशी येथील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. मुरुड पोलीस या दोघांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. त्यांनी काशीद येथे येताना स्वतःची चार चाकी गाडी सुद्धा होती. ती समुद्र किनारी पार्क करून ते पोहावयास गेले होते. सदरील घटनेचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अविनाश झावरे व पोलीस नाईक सागर रोहेकर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version