| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
एन.आय.एने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. यात महाराष्ट्रातील कार्यालयांचाही समावेश आहे. पनवेलमधील बंदर रोड परिसरातील इमारतीमधून एका व्यक्तीलाही पथकाने ताब्यात घेतल्याने खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन.आय.ए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने संयुक्त रित्या केलेल्या कारवाईत पनवेल मधून एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा संबध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या या संघटनेशी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील नेरुळ येथील पी.एफ.आयच्या कार्यालयात रात्री 3 च्या सुमारास छापेमारी केली आहे. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांत नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पी.एफ.आयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळमधून देखील 4 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अतिरेकी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. असे असले तरी नेरुळ सेक्टर 23 दारावे गाव या गावठाण भागात त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्या नंतर तब्बल 7 तासांच्या तपासणी नंतर 4 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक व्यक्ती याच परिसरातील रहिवासी असल्याचेही बोलले जाते.
कार्यालय असलेला परिसरसात दैनंदिन गरजा भागावणारी दुकाने आहेत मात्र सदर घटने नंतर या कार्यालय आणि त्या ठिकाणी काम करणार्यांच्या बाबत सर्वांनी मौन बाळगले आहे. या ठिकाणी सहा ते सात जण कायम संगणकावर काम करीत असतात कोणीही फारसे बोलत नाही कामाशी काम अशा पद्धतीने काम चालते. अशी माहिती येथे येणार्या एका व्यक्तीने दिली.