| मुंबई | प्रतिनिधी |
शहापूरात एका ज्वेलर्सच्या दुकानासमोरच सेल्समनवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहापूर शहरालगत गोठेघर हद्दीतील पंडीतनाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानासमोर शनिवारी (दि.21) रात्री साडेदहा वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुकानाचे कामगार आणि सेल्समन दिनेश चौधरी हे गंभीरपणे जखमी झाले. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान चौधरीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी दुकान बंद करून बाहेर पडत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते दोघे घटनास्थळावरून एक बॅग घेऊन फरार झाले. या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली असून, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. श्वानपथकाच्या मदतीने घटनास्थळाची झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. चौधरी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु त्यांना ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आणि उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहापूरमधील व्यापारवर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपासाची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपींच्या शोधासाठी त्यांच्या ताब्यात असणाऱ्या ठिकाणी शोध घेत आहेत.