| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई विमानतळावर अनेकदा सोनं तस्करी करणाऱ्यांना पकडले जाते. मात्र, नुकतीच या विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. मोहम्मद आफ्रिद (24) असे आरोपीचे नाव असून कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना (दि.3) जून रोजी घडली. त्याच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल होता. (दि.3 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास दुबईतून मुंबईत आलेला प्रवासी मोहम्मद आफ्रिद याला एका महिला अधिकाऱ्याने अडवले. कर्नाटकातील सिध्दापुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोहम्मद आफ्रिद हा आरोपी असून कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. तपासात मोहम्मद आफ्रिद हा तोच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारदारांनी त्याला इमिग्रेशन विंग इनचार्ज यांच्या चौकशी कक्षात बसवून ठेवले. मात्र, मोहम्मद आफ्रिद याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू असतानाच 11.30 च्या सुमारास त्याने स्वतः जवळील धारदार वस्तूने डाव्या हाताच्या मनगटाची नस कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. जखमी मोहम्मद आफ्रिद याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.