| नवी मुंबई | वार्ताहर |
नवी मुंबई खारघर परिसरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या (31) वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आठ दिवसांनी गुन्हा दाखल झाला. खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 मधील इनोव्हेटीव्ह हाईट्स या इमारतीमध्ये 1102 क्रमांकाच्या घरात अर्चना व आमोध सिंग हे दाम्पत्य राहत होते.
आमोध सिंग हा सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. आमोधसोबत अर्चनाचे 30 नोव्हेंबर 2014 रोजी लग्न झाले होते. या दोघांना 7 आणि 3 वर्षांची दोन मुले आहेत. मात्र आमोदच्या छळाला कंटाळून (दि.3) मे रोजी अर्चनाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. अर्चना यांच्या भाऊ अमनकुमार याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सासरहून हुंड्यासाठी छळ सुरु होता. आमोध पत्नीला मारहाण करायचा आणि आई-वडिलांकडे पैसे मागायचा. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीच्या सांगण्यावरून शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते. पण तोटा झाल्यास तो तिला दोष देत असे. (दि.3) मे रोजी अर्चनाने तिच्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अर्चनाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, शुक्रवारी कलम 306, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नवी मुंबई पोलीस करीत आहेत.