नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साळोख ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नारळे वाडी येथे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी 30 हजार रुपये खंडणी मिळावी, यासाठी साळोख गावातील शोएब बुबेरे याने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तुलाचा धाक दाखवणार्या तरुणाला नेरळ पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.
साळोख ग्रामपंचायतमधील नारळे वाडी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील संजू जगदीश मोहिते हे ठेकेदार म्हणून काम पाहत आहेत. त्या ठिकाणी साळोख येथील शोएब बुबेरे हा तरुण गेला आणि स्वतःकडील पिस्तुलाचा धाक दाखवून मोहिते यांच्याकडे 38 हजाराची मागणी करू लागला.
19 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता तेथील काम चालू असलेल्या ठिकाणी शोएबने आपल्या दोन साथीदारांसोबत तोडफोड केली. एका हातात पिस्तूल घेऊन आणि दुसर्या हातात कटावणी घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण केली अशी तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत बंदूक पाहून संजय मोहिते आणि त्यांचे अन्य सहकारी घाबरून गेले असल्याचेही सांगितले. त्यावेळी त्यातील एकाने त्याचा व्हिडिओ काढला. परंतु व्हिडिओ काढत असताना शोएबने मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यामधील सर्व व्हिडिओ डिलीट केले. संजीव यांच्या एका साथीदाराने तो व्हिडिओ त्याच्या भावाला व्हॉट्सअपला पाठवला होता. तो व्हिडिओ डिलीट करायचा राहून गेला होता. शेवटी हाच पुरावा म्हणून त्याने नेरळ पोलीस ठाण्यामध्ये दाखवला.
सदरील घटनेचे गांभीर्य व मोबाईलमधील व्हिडिओ पाहून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या सहकार्यांसह रात्रीच त्या भागात जावून शोएब यास पकडून आणले. सध्या पिस्तुलाचा धाक दाखवून धमकवणारा शोएब हा पोलिसांच्या ताब्यात आहे.
बंदुकीचा तपास सुरु
ही बंदूक शोएबने कोठून आणली? त्याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे की नाही? याबाबत नेरळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. दुसरीकडे बंदुक खरी आहे की, खोटी आहे याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड करीत आहेत.