आजारपणाला कंटाळून पतीने केला खून
जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातील खळबळजनक कृत्य
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात ८९ वर्षांच्या वृद्धाने पत्नी आणि मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीपासून जवळ असणाऱ्या प्रेम संदेश सोसायटीत हा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी शेर-ए -पंजाब नावाची कॉलनी आहे. त्या ठिकाणी हा खूनाचा थरार उघडकीस आला.
हत्या केल्यानंतर आरोपी बराच वेळ दोघींच्या मृतदेहाजवळ बसून होता. पत्नी आणि मुलीच्या आजारपणाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलं. जसबीर कौर गंडलोक (वय ८१) असे त्याच्या पत्नीचं नाव आहे.
तर कमलजित कौर गंडलोक (वय ५५) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पती पुरषोत्तमसिंग गंडलोक याला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. यानंतर जागेचा पंचनामा करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.